“सबला अहं बहुबलधारिणी” या उक्तीप्रमाणे एक सशक्त आत्मनिर्भर आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्ती म्हणून स्त्रियांनी समाजात वावरावे ही मनीषा डोळ्यासमोर ठेवून “रेणुका स्वरूप प्रशालेची” वाटचाल सुरु आहे. हा एक न संपणारा प्रवास आहे आणि आमच्या प्रशालेचे “ध्येयवाक्य” हे वाक्य न राहता ते प्रत्यक्षात कसे उतरेल ह्या साठी माझा सर्व परिवार अथक परिश्रम करीत आहे. परिवार? हो – परिवारच ! कारण रूढार्थाने ही जरी शाळा असली तरी परिवारात, कुटुंबात असणारा जिव्हाळा ही आमची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व जण कोणतेही आव्हान, कोणतेही जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज असतो. अभ्यासातून खेळापर्यंत आणि साहित्य-कलेपासून ते समाजसेवेपर्यंत अशा विविध क्षेत्रात आमच्या “रेणुकांनी” झेप घेतली आहे. आणि ही झेप ‘ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ अशीच आहे. आज सर्व क्षेत्रात आमच्या रेणुका अग्रेसर आहेत. मग ते पाक कौशल्य असो की नेमबाजी कौशल्य … पण एवढेच आमचे ध्येय नाही… एका सशक्त स्त्री बरोबरच एक सक्षम व्यक्ती,एक कणखर आई ,एक उत्कृष्ट समाज सेविका आणि अतुलनीय भारताची एक जबाबदार नागरिक तयार होणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो आणि त्या साठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सदैव राहू. आमच्या ह्या ध्येयपूर्ती च्या प्रवासात आम्हाला साथ लाभली आहे ती आमची शाला समिती आणि शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणारी आमची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी!!!