उच्च माध्य. विभाग उपक्रम व कार्यक्रम

वीर सावरकर चित्रपट

विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यातील योगदानाची माहिती देणे, सावरकरांचे ब्रिटीश सरकार, क्रांतिकारक, अहिंसा, समता इत्यादींवर असलेल्या परखड मतांविषयी माहिती करून देणे,  इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी देशासाठी केलेले सर्वस्वाचे बलिदानाची विद्यार्थिनींना माहिती देणे अशा उदात्त हेतूने ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता ११वी च्या १०५ विद्यार्थिनी व ५ शिक्षक अशा ११० जणांना वीर सावरकर चित्रपट दाखविण्याचा कार्यक्रम करण्यात आला.

          फेसबुकद्वारे या कार्यक्रमासाठी आर्थिक देणगीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत न्यूजर्सी, अमेरिका येथे वास्तव्य असलेले श्री श्रीकांत विनायक जोशी आणि श्रीमती मधुवंती जोशी यांनी विद्यार्थिनींना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखविण्यासाठी आर्थिक देणगी दिली. वीर सावरकरांचे कार्य मुलींना समजले पाहिजे अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली.

          दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ८:०० वाजता डेक्कन सिटीप्राइड, पुणे येथे सदर चित्रपटाच्या विशेष शो चे नियोजन करण्यात आले होते. देशभक्तीने भारावलेल्या सर्वच विद्यार्थिनींना चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले होते.

          चित्रपट संपल्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी वीर सावरकरांचे देशासाठी केलेले एवढे मोठे योगदान प्रथमच समजले अशी भावना व्यक्त केली.

 

अभ्यासक्रमाबरोबर शिका Tally कोर्स ……

रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज मध्ये नेहमीच अभ्यासक्रमाबरोबरच भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर घडविण्यासाठी आवश्यक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. कॉमर्समध्ये आलेल्या सर्व विद्यार्थिनींनी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच भविष्यामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी संगणकावर टॅलीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच पुढील उच्च शिक्षण हे  रोजगार मिळवत पूर्ण करावे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कॉलेजच्या वेळेला जोडूनच रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स च्या माध्यमातून टॅलीचा कोर्स दिला आहे. सरकार मान्य असलेला हा टॅलीचा कोर्स सहा महिन्याचा असून अकरावीच्या वर्षांमध्ये जानेवारी महिन्यापासून इयत्ता१२ वी च्या वर्षात जुलै महिन्यापर्यंत हा कोर्स पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात सरकारी परीक्षा देऊन हा कोर्स पूर्ण करायचे निश्चित करण्यात आले.  टॅलीचे सरकारी प्रमाणपत्र मिळवायचे असे ध्येय निश्चित केले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्स या संस्थेमध्ये संपूर्ण बॅच मध्ये टॅली कोर्ससाठी  जागा शिल्लक होत्या. सर्वच्या सर्व  जागा आपल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये कोर्स देऊन पूर्ण केल्या. विद्यार्थिनींनी कॉलेजचा अभ्यास सांभाळून कॉलेजच्या वेळेनंतर रोज एक तास टॅलीच्या कोर्ससाठी जास्तीचा वेळ दिला. २०२३-२४ या वर्षामध्ये आपल्या सरकारमान्य टॅली कोर्सचा १००% निकाल लागला आणि इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेबरोबरच सर्व विद्यार्थिनींनी सरकारमान्य टॅलीचा कोर्स पूर्ण करण्यात यश मिळविले. रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजची टॅली कोर्सची पहिली बॅच या २०२३-२४ वर्षामध्ये यशस्वीरीत्या बाहेर पडली आहे. इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आणि टॅलीचा सरकारमान्य कोर्स करून सुट्टीमध्ये अकाउंटिंग चे काम करण्याचा मानस अनेक विद्यार्थिनींनी बोलून दाखवला.  ज्युनिअर कॉलेजच्या मार्गदर्शनामुळे उत्पन्न मिळविता मिळविता उच्च शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थिनींनी ठरविले. अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज हे एक वैशिष्ट्यपूर्ण कॉलेज असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकांनी आपल्या मनोगतात सांगितले.

जिल्हा परिषद स्पर्धेत रिद्धी ठाकूर चे यश

दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ जिल्हा परिषद आयोजित आंतरशालेय पिस्टल शूटिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या रेणुका स्वरूपच्या  इयत्ता १२ वी मध्ये शिकणाऱ्या कु. रिद्धी ठाकूर या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये कु. रिद्धी ठाकूरने ४०० पैकी ३४५ गुण मिळविले. सदर स्पर्धेमध्ये कु. रिद्धी ठाकूरने सिल्वर मेडल मिळवत दुसरा क्रमांक मिळविला.

          रिद्धी आपल्या या यशाचे श्रेय प्राणायाम, नियमित सराव आणि कॉलेजकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला देते.     

सिल्वर मेडल मिळविणारी रिद्धी ठाकूर

 

 

*मतदार जनजागृती अभियान*

       दिनांक 10 एप्रिल 2024 रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज, निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन तसेच स.प. महाविद्यालयाच्या चौकामध्ये मानवी साखळी, पथनाट्य अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. १८ वर्षे पूर्ण झालेले नवमतदार असो किंवा नियमित मतदान करणारे तसेच विविध कारणांमुळे मतदान न करू शकणारे मतदार डोळ्यासमोर ठेवून हे अभियान राबविण्यात आले. रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम आणि अन्य पदाधिकारी यांच्या सहकार्याने अभियान उत्तम पद्धतीने झाले. या प्रसंगी मा. मुख्याध्यापिका श्रीमती नाईक मॅडम, पर्यवेक्षक श्री जगताप सर, श्रीमती गायकवाड मॅडम उपस्थित होते. या अभियानात 215 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नायब तहसीलदार स्मिता कुलकर्णी मॅडम तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी नोडल अधिकारी श्री शरद मेमाणे सर उपस्थित होते. या विविध उपक्रमांद्वारे रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे व या दिवशी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाणे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे मतदान न करणे हे योग्य नाही, तसेच देशाच्या विकासामध्ये आणि पंतप्रधान यांच्या नियुक्तीसाठी मतदान करणे किती आवश्यक आहे, उद्याचा भारत आपणच घडविणार आहोत अशा पद्धतीने मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. प्रशालेतील सर्व पदाधिकारी, शिक्षकांनी व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी मतदान प्रतिज्ञा घेऊन सदर अभियानाची सांगता केली. सदर कार्यक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज ने केलेल्या उपक्रमाची दखल वृत्तपत्राने घेतली.
केसरी वृत्तपत्राने मतदार जनजागृती अभियानाची दखल घेतली…
मतदार जनजागृती अभियानांतर्गत शिक्षक, विद्यार्थिनी व पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली…

जुनियर कॉलेजला सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन

आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन या संस्थेस आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विविध माध्यमातून जे प्लास्टिक संकलित करून प्रदान केले होते, त्याबद्दल आपल्या जुनियर कॉलेजला सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन मिळाले आहे. या अभियानांतर्गत आपल्या ज्युनिअर कॉलेजने एकूण १५८ किलो प्लास्टिक हे रिसायकल करण्याकरिता या संस्थेस दिले होते. यामुळे ६५.४ किलो कार्बन आपण पर्यावरणात जाण्यापासून वाचविले आहे.

सर्वांचे अभिनंदन 💐💐🍨

CERTIFICATE OF APPRECIATION चा स्वीकार करताना मा. पदाधिकारी व ज्युनिअर कॉलेज चा शिक्षक वृंद

ज्युनिअर कॉलेज प्लॅस्टीक प्रदान कार्यक्रम

आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजमधील सर्व विद्यार्थिनींनी गेले काही महिने समाजातील विविध घटकातून व तसेच स्वतःच्या घरातून संकलित केलेले प्लॅस्टीक कुशाग्र इनोवेशन्स फाउंडेशन या संस्थेला प्रदान करण्यात आले. प्लॅस्टीक प्रदान करण्यापूर्वी सर्व विद्यार्थिनींना सदर प्लॅस्टीकची प्रक्रिया, तसेच त्याचे विविधकरण, पुन:प्रक्रिया, पुन:वापर तसेच पुन:चक्रीकरण याबाबत कुशाग्र इनोवेशन फाउंडेशनचे संस्थापक सदस्य श्री आलोक गोगटे सर यांनी याबाबत माहिती दिली. प्लॅस्टीक बॉटल्स, प्लॅस्टीकच्या पिशव्या आणि प्लॅस्टीकचे कॅन व डबे यांचे वर्गीकरण करून आज साधारणपणे १७८ किलो प्लॅस्टीक प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. प्लॅस्टीक प्रदान कार्यक्रमास मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम, उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद, इयत्ता ११ वी च्या विद्यार्थिनी आणि कुशाग्र इनोव्हेशन फाऊंडेशन चे संस्थापक सदस्य श्री आलोक गोगटे व संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

 

 

रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विद्यालय प्लास्टीक प्रदान कार्यक्रम

व्हेलेंटाईन डे आणि आपली संस्कृती व्याख्यान

आजच्या आधुनिक जगात १४ फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा होताना आपण बघत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीवर अशी अनेक पाश्चात्य वैचारिक आक्रमणे होत आहेत, म्हणूनच आजच्या किशोरवयीन तरुणांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महिला उत्थान मंडळ, पुणे सदस्य श्रीमती प्राणवी बोऱ्हाडे यांचे व्हेलेंटाईन डे आणि आपली संस्कृती या विषयावर इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान घेण्यात आले.

          सदर व्याख्यानात वक्त्यांनी विद्यार्थिनींमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. भारतीय संस्कृतीचा वारसा, आपले दैनंदिन वर्तन, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाचे दुष्परिणाम, चारित्र्य संवर्धन आणि मातृ पितृ पूजन इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींनी या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन केले.

                व्हेलेंटाईन डे साजरा न करता आम्ही मातृ पितृ पूजन दिन साजरा करू असा संकल्प करून व्याख्यानाची सांगता झाली.

 

आंतरमहाविद्यालयीन रिंगोस्टीक स्पर्धा विजेतेपद २०२४

दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी झालेल्या म ए सो सिनिअर कॉलेज आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *आंतरमहाविद्यालयीन रिगोस्टिक स्पर्धेत* मुलींच्या गटात अत्यंत जिगरबाज आणि जबरदस्त खेळ करत सर्व संघांना पराभूत करून आपल्या रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज ने प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक मिळवले.

सर्व सहभागी विद्यार्थिनी, शिक्षक व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन🍨🍨🍨🍨🍨

रिंगोस्टीक स्पर्धा विजेता संघ

*इयत्ता १० वी वाणिज्य विभागातील संधी मार्गदर्शन :-*  

आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ इयत्ता दहावीतील ज्या विद्यार्थिनींना कॉमर्स क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कोणत्या साईडला जायचे हे ठरविलेले नाही, अशा सर्व विद्यार्थिनींसाठी कॉमर्स शाखेमध्ये कशा पद्धतीने संधी आहे, तसेच आपल्या रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजमध्ये कोणते कोणते उपक्रम, कार्यक्रम, कोर्सेस आणि अभ्यासक्रम चालतो या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली. त्यासंदर्भामध्ये सुरुवातीला श्रीमती हेमलता जगताप मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर श्री सागर वाळके सर यांनी रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेज संदर्भात माहिती देणारे पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. सादरीकरणानंतर अनेक विद्यार्थिनींच्या शंकांना उत्तरे देण्यात आली.

*अर्थशास्त्रीय जत्रा 2023-24*

 

दिनांक 14 डिसेंबर 2023 आणि 15 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्रीय जत्रा संपन्न झाली. अर्थशास्त्री जत्रेचे यंदाचे हे १३ वे वर्ष आहे. दिनांक 14 डिसेंबर 2023 या दिवशी माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून अर्थशास्त्रीय जत्रेचे उद्घाटन झाले.

त्यानंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा पार पडली. दिनांक 15 डिसेंबर 2023 या दिवशी पोस्टर स्पर्धा आणि संकल्पना नाट्य स्पर्धा पार पडली. या अर्थशास्त्रीय जत्रेमध्ये एकूण 71 पोस्टर, 59 रांगोळ्या, 7 संकल्पना नाट्य, 9 व्हिडिओ आणि 23 PPT इत्यादींचे सादरीकरण झाले. इयत्ता बारावीतील काही निवडक विद्यार्थिनींनी या जत्रेमध्ये सर्व विद्यार्थिनींचे परीक्षण केले आणि त्याप्रमाणे गुणदान केले. 15 डिसेंबर 2023 या दिवशी अर्थशास्त्रीय जत्रेचा सांगता समारंभ पार पडला. या सांगता समारंभामध्ये अर्थशास्त्रीय जत्रेच्या व्यवस्था प्रमुख विद्यार्थिनी आणि श्री वाळके सर यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी परीक्षक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच प्राध्यापक श्री सागर वाळके सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्रीय जत्रेसाठी सर्व विद्यार्थिनींनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांनी अर्थशास्त्र विषयांमध्ये भविष्यातील संधी आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल कशी करावी तसेच बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, नियोजनाचे आणि प्रयत्नांचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले. अर्थशास्त्रीय जत्रेत उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करून अर्थशास्त्रीय जत्रेची सांगता झाली. या जत्रेमध्ये इयत्ता अकरावी मधील 29 स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडल्या. यंदाचा अर्थशास्त्रीय जत्रेचा अनुभव हा विद्यार्थीनींसाठी आत्मविश्वास वाढविणारा ठरला.

 

 

रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभाग *क्रीडा स्पर्धा 2023-24*

 

९ डिसेंबर २०२३ शनिवार या दिवशी उच्च माध्यमिक विभागात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. क्रीडा महोत्सवात मा.मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नाईक मॅडम मा.उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम, मा.पर्यवेक्षक श्रीमती सुनिता गायकवाड मॅडम, मा.पर्यवेक्षक श्री. जयसिंग जगताप सर उपस्थित होते. मा.मुख्याध्यापिका यांनी झांज वाजवून या स्पर्धेची सुरुवात केली.

स्पर्धेमध्ये डॉजबॉल, रिंगोस्टीक आणि रिले इ.खेळाचा समावेश होता.११ वी व इ.१२ वी मधून एकूण १९६ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.

  सदर स्पर्धेमध्ये इ १२ वी अबोली चा रिंगोस्टीक स्पर्धेत प्रथम क्रमांक तर  इ.१२ वी गुलाब या वर्गाने डॉजबॉल व रिले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

   मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम यांनी विजेत्या संघाला फिरती ढाल देऊन कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या जीवनातील व्यायाम, खेळ तसेच प्राणायाम याचे उत्तम आरोग्यासाठी असलेले महत्व विशद केले. यावर्षीच्या स्नेहसंमेलन कार्यवाह श्रीमती मनीषा साळुंके यांनी स्नेहसंमेलनातील आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. भारतमातेच्या जयजयकाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

क्रीडा स्पर्धा

 

मिस रेणुका स्पर्धा

दिनांक 12/12/2023 या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागात स्नेहसंमेलन 2023-24 या अंतर्गत  ‘ *मिस रेणुका’* ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये इ. 12वी अबोली व गुलाब मधील एकूण 30 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.  इ. 12वी  अबोली मधील कुमारी रिद्धी ठाकूर  ही या स्पर्धेत विजेती झाली. सदर स्पर्धेचे परीक्षण श्रीम. बनकर मॅडम व जु. कॉलेज विभाग प्रमुख श्रीमती हेमलता जगताप यांनी केले. यात विद्यार्थिनींचे सामान्य ज्ञान ,विषय ज्ञान व प्रासंगिक ज्ञान यावर आधारित तीन फेऱ्यांमध्ये  प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेच्या नियोजन व आयोजनात प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती अनिता नाईक ,माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले ,माननीय पर्यवेक्षिका श्रीमती सुनिता गायकवाड व पर्यवेक्षक श्री जगताप सर यांनी मार्गदर्शन केले . खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.

 

खाद्य महोत्सव

दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 हा कालावधी मध्ये ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी *’खाद्य महोत्सव*’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . या उपक्रमात  इयत्ता अकरावीतील एकूण 40 विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या अंतर्गत  विद्यार्थिनींना मार्केट सर्व्हे  म्हणजे काय?  वस्तूचे मार्केटिंग कसे करावे? पदार्थाची किंमत ठरविताना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो? जाहिरातीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो ? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. सँडविच, वडापाव, समोसा व इडली याचे प्रत्येकी दोन स्टॉल लावण्यात आले. प्रत्येक स्टॉलवर तीन  विद्यार्थिनींचा एक गट असे गट करण्यात आले. सकाळी 8:00 ते 11:00  या कालावधीत पदार्थांची विक्री करण्यात आली. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीसह शाळेतील विद्यार्थिनींनी सुद्धा पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. नफ्या बरोबरच व्यवसायात  ग्राहकांचे  समाधान हे खूप महत्त्वाचे असते. हे विद्यार्थीनीना मनापासून पटले. या उपक्रमातून अनेक विद्यार्थिनींमध्ये आपणही उद्योजक होऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला.

डिश डेकोरेशन परीक्षण करताना मा. परीक्षक

वाणिज्य दिवस

 

 

रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य दिन साजरा…. महाराष्ट्र टाईम्स मध्ये बातमी…..

 

 

                सोमवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य दिवस साजरा करण्यात आला.

विद्यार्थिनींना वाणिज्य विषयातील अवघड व क्लिष्ट संकल्पना सोप्या व्हाव्या, वाणिज्य विषयातील नवनवीन संधी व वाटा कळाव्यात,विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा,सहकार्य भावना वाढीस लागावी याकरिता वाणिज्य विषयातील विविध घटकांवर चार्ट व मॉडेल विद्यार्थिनींनी तयार केले.

  तसेच वाणिज्य दिनाच्या निमित्ताने  श्री. भगवान पांडेकर सरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वाणिज्य विषयातील व्यावसायिक व नोकरी विषयक संधी,   वाणिज्य विषयातील विविध स्पर्धा परीक्षा, इ.12 वी नंतर विविध डिग्री व डिप्लोमा कोर्स इ. विषयक मार्गदर्शन सरांनी केले.

  प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती जोग मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती हिले मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम  संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. वैष्णवी थोरात तर सूत्रसंचालन व परिचय कु. नेहा भापसेकर हिने केले. कु. आकांक्षा पाटोळे हिने मान्यवरांचे आभार मानले.

व्यसनाधीनता व त्याचे दुष्परिणाम व्याख्यान

 

दिनांक १४ जुलै २०२३, उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनींशी पुणे पोलीस नार्कोटिक्स विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्री ज्ञानेश्वर घोरपडे आणि औंध हॉस्पिटल येथे कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मोहिनी सुरवसे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. सामाजात व्यसनासंदर्भात घडणाऱ्या चुकीच्या घटनांना कसे कमी करता येईल, व्यसने कोणत्या प्रकारची असतात, आपल्याला एखादे व्यसन असल्यास ते लपवून न ठेवता शिक्षक व पालकांशी संवाद साधून कसे कमी करता येईल, व्यसनांमुळे मानवी शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे व्यसन कसे कमी करता येईल इत्यादी विषयांवर PPT सादरीकरण करून चर्चा करण्यात आली.

व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता उत्तम आरोग्य ठेवून सक्षम भारत निर्माण करण्याचा निर्धार सर्व विद्यार्थिनींनी व्यक्त केला.

सुरक्षा व दामिनी पथक व्याख्यान

 

दिनांक ३ जुलै २०२३, उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता १२ वी च्या वर्गात पुणे पोलीस विभागातील दामिन पथकाच्या महिला पोलिसांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. सामाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांना कसे सामोरे जावे, मित्र मैत्रिणींशी कसे संबंध असावेत, आपल्या मर्यादा पाळणे कसे आवश्यक आहे, सामाजिक माध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, आपल्या पालकांशी नेहमी संवाद साधणे कसे गरजेचे आहे इत्यादी विविध मुद्यांवर संवाद साधला.

 आपत्कालीन परिस्थितीत १००, ११२  या नंबर वर फोन केल्यास महिला दामिनी पथक आपल्या मदतीला कोठेही धावून येऊ शकते. आपण प्रसंगाचे भान ठेवून न घाबरता आत्मविश्वासाने संकटाला सामोरे गेले पाहिजे असा विश्वास दामिनी पथकाने विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला.

 

 

अर्थशास्त्रीय जत्रा २०२२-२३ 

दिनांक २५ आणि २६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी अर्थशास्त्रीय जत्रेचे आयोजन केले होते. कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे पूजन व दीप प्रज्वलन आणि फीत कापून अर्थशास्त्रीय जत्रेचे उद्घाटन झाले. २५ डिसेंबर ला कार्डशीट स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. कार्डशीट स्पर्धेमध्ये ७८ कार्डशीट तर रांगोळी स्पर्धेमध्ये ७० रांगोळ्या रेखाटल्या गेल्या. तसेच २२ संकल्पना नाट्य आणि ३० PPT चे सादरीकरण करण्यात आले.

या व्यतिरिक्त नवीन प्रयोग म्हणून अर्थशास्त्रावर आधारित व्हिडीओ क्लिप स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनींनी १२ वी च्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध संकल्पना आणि सिद्धांतावर व्हिडीओ क्लीप तयार केल्या. या स्पर्धेमध्ये २२ विद्यार्थिनींनी ११ क्लिप तयार केल्या होत्या.

कार्डशिट, रांगोळी, संकल्पना नाट्य, PPT या सर्व स्पर्धांमध्ये १२ वी च्या १४८ विद्यार्थिनींनी भाग घेतला होता आणि त्याचे सादरीकरण केले होते. या सर्व सादरीकरणांचे परीक्षण करण्यासाठी १२ वी च्या एकूण १२ गुणवंत विद्यार्थिनींना परीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. सर्व विद्यार्थिनी परीक्षकांनी सहभागी विद्यार्थिनींचे सादरीकरण पाहून गुणदान केले. परीक्षणाचा अनुभव परीक्षक विद्यार्थिनींना संपन्न करून गेला.

            २६ नोव्हेंबर दुपारी ३:३० वाजता अर्थशास्त्रीय जत्रेच्या समारोपाचा कार्यक्रम सुरु झाला. ११ वी च्या स्वयंसेवकांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार इ. भूमिका उत्तम पद्धतींनी पार पाडल्या. समारोप कार्यक्रमास उच्च माध्य.विभागाच्या मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले  आणि उच्च माध्यमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती हेमलता जगताप उपस्थित होत्या. जत्रेत सहभागी विद्यार्थिनी व परीक्षकांनी आपल्या मनोगतात सहभागी विद्यार्थिनी व मा. मुख्याध्यापिकांना धन्यवाद दिले. तसेच असे उपक्रम घेणारी रेणुका स्वरूप हे पुण्यातील एकमेव उच्च माध्य. विद्यालय आहे असे मत व्यक्त केले. तर मा. उपमुख्याध्यापिकांनी सर्व विद्यार्थिनींच्या  सहभागाचे व स्वयंसेवक विद्यार्थिनींचे कौतुक केले.

सदर उपक्रमातून १२ वी च्या विद्यार्थिनींच्या  अर्थशास्त्राशी संबंधित अनेक संकल्पना, सिद्धांत, आकृत्या, मुद्दे एकदम पक्के झाले हे एक मोठे यश मिळाल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली.

                        मिस रेणुका स्पर्धा २०२२

विद्यार्थिनींमध्ये ध्येय निश्चिती व्हावी, सभाधीटपणा यावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा  विकास व्हावा या उद्देशाने दिनांक १४ डिसेंबर २०२२  या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागात ‘मिस रेणुका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनी स्पर्धक म्हणून तर इयत्ता ११ वी च्या विद्यार्थिनी प्रेक्षक म्हणून सहभागी झाल्या. यामध्ये स्व-परिचय, सामान्य ज्ञान, प्रसंगावधानता इत्यादी विविध प्रकारच्या फेऱ्या घेऊन विद्यार्थिनींना सादरीकरणाची संधी देण्यात आली. स्पर्धक विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने परीक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली. उच्च माध्यमिक विभागातील  इ. १२ वी  अबोली मधील सृष्टी मुकुंद राऊत या विद्यार्थिनींची  ‘मिस रेणुका – २०२२ ‘ म्हणून निवड करण्यात आली व प्रशालेच्या स्नेहसंमेलच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात मिस रेणुका चा मुकुट आणि उपवितक प्रदान करून तिचा गौरव करण्यात आला.  सदर परीक्षेचे परीक्षण प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका व प्रसिध्द कीर्तनकार श्रीमती निवेदिता महेंदळे आणि श्रीमती श्वेता कुलकर्णी यांनी केले.

 

 सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प

विद्यार्थिनींना सेंद्रिय खताचे महत्त्व समजावून सांगणे व त्याची अनुभूती देणे, ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच सेंद्रिय खत संदर्भात विद्यार्थिनी व समाजात जनजागृती व प्रबोधन करणे या उद्देशाने उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी शाळेमध्ये प्रत्यक्षरीत्या सेंद्रिय खत निर्माण केले.

जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत विद्यार्थिनींनी घरातील निर्माल्य म्हणजेच हार, फुले, दुर्वा, भाज्यांचे ओले देठ आणि अन्य ओला कचरा संकलित करून शाळेच्या परिसरातील पिट मध्ये (विशिष्ठ ठिकाणी) प्रक्रियेसाठी जमा केला. त्यामध्ये विद्यार्थिनींनी विघटन करणारे घटक टाकून काही दिवसांच्या कालावधीने ते नियमितपणे खाली-वर हलवून ओलावा टिकण्यासाठी पाणी शिंपडले. काही कालावधी नंतर त्यावर प्रक्रिया होऊन खत तयार झाल्याचे निदर्शनास आले. हे खत चाळणीने चाळून मोठ्या बकेट मध्ये विद्यार्थिनींनी एकत्रित केले. वाणिज्य शाखेशी शाश्वत विकासाचा सहसंबंध लक्षात घेता विद्यार्थिनींनी या तयार झालेल्या सेंद्रिय खताचे मार्केटिंग व जाहिरात करून त्याची विक्री प्रशालेतील विद्यार्थिनी, शिक्षक, माजी विद्यार्थी मेळावा यांमध्ये केली.

          सदर उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींना ओला कचरा व निर्माल्यापासून  सेंद्रिय खत कसे निर्माण करावे याची माहिती मिळाली. यातूनच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याची तसेच शाळेतील व समाजातील घटकांमध्ये यासंदर्भात प्रबोधन व जनजागृती करण्याची जाणीव विद्यार्थिनींच्या मनामध्ये निर्माण झाली.

      प्लॅस्टिक संकलन आणि पुनर्निर्मिती प्रक्रिया प्रदान कार्यक्रम

 विद्यार्थिनींना प्लॅस्टिक चे दुष्परिणाम समजावून सांगणे, प्लॅस्टिक चा पुन्हा वापर कसा करता येईल, टाकाऊतून टिकाऊ कसे तयार करावे, तसेच प्लॅस्टिक चा दैनंदिन जीवनातील वापर कसा कमी करावा याबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करणे या उद्देशाने उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी विविध अभियान राबवून शाळा व परिसरातून आणि आपल्या घरातून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक संकलन केले.

          विद्यार्थिनींनी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर कसा वाढवावा या संदर्भात आपल्या घराच्या परिसरात तसेच शाळेतील विद्यार्थिनींचे वर्गांमध्ये जाऊन प्रबोधन केले. या उपक्रमातून नवी करिअरची वाट देखील सापडू शकेल अशी जाणीव विद्यार्थिनींना झाली.

 दिनांक १८/०१/२०२३ या दिवशी केशव सीता ट्रस्ट या संस्थेला आपल्या रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागाकडून एकूण ४९१ किलो प्लॅस्टिक रिसायकल करण्याकरीता देण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक संकलन करून जनजागृती केल्याबद्दल केशव सीता ट्रस्ट यांच्याकडून रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागास Certificate of Appriciation  देऊन गौरव करण्यात आला.

११ वी स्वागत समारंभ

दिनांक १९ सप्टेंबर २०२२, सोमवार या दिवशी इ.११वी तील विद्यार्थिनींनीकरीता विद्यालयातील पदाधिकारी, शिक्षक यांची ओळख व्हावी या उद्देशाने ११वी स्वागत समारंभ प्रशालेतील रेणुका हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. इ.१२वी तील विद्यार्थिनींनी रांगोळी, फलक लेखन, वर्गस्वच्छता, सजावट ,भेटकार्ड देऊन इ.११ वीतील विद्यार्थिनींचे स्वागत केले. श्रीदेवी भंडारी आणि सिद्धी फासगे या इ.१२वी तील विद्यार्थिनींनी आपले ज्युनिअर कॉलेज विषयीचे अनुभव ११वी तील विद्यार्थिनीं समोर व्यक्त केले. याप्रसंगी मा. मुख्याध्यापिका, पदाधिकारी ,ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक, कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक व ग्रंथपाल यांचा विद्यार्थिनींना परिचय करून देण्यात आला. ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख श्रीम.हेमलता जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. पूजा जोग मॅडम यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. अकरावीतील विद्यार्थिनींना पेढा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

 

 

 

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेणुका स्वरूप मेमो.गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विभागातील १२ वी तील विद्यार्थिनींनी स्वातंत्र्याच्या क्रांतियज्ञामध्ये स्वतःच्या जिवाची आहूती देणाऱ्या तसेच योगदान देणाऱ्या ७५ अज्ञात क्रांतिवीरांचे स्मरण करण्याच्या उपक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले.यामध्ये दिनांक १ जुलै २०२२,शुक्रवार पासून ते २५ ऑगस्ट पर्यंत रोज एका क्रांतिकारकांची माहिती एका विद्यार्थिनीने परिपाठामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थिनींना सांगावी असे निश्चित करण्यात आले. यासाठी उच्च माध्यमिक विभागातील ७५ विद्यार्थिनींनी ७५ क्रांतिकारकांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केला.

दिनांक १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत “नमन तुझ अनामविरा” हे ७५ क्रांतीकारकांना मानवंदना देणारे प्रदर्शनी दालन तयार करण्यात आले. या दालनामध्ये ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी स्वतः च्या हाताने क्रांतीकारकांची चित्रे काढून माहितीचे संकलन केले आणि प्रदर्शनी स्वरूपात सादरीकरण केले. या दालनाच्या उद्घाटनासाठी प्रसिध्द व्यंग चित्रकार श्री चारुहास पंडित उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा होत असल्याची भावना या प्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

 

 

गुरुपौर्णिमा

दिनांक 13 जुलै 2022,बुधवार या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागातील इ.12 वी मधील विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमेनिमित्त व्यासाच्या प्रतिमेचे पूजन मा.उपमुख्याध्यापिका श्रीम.हिले मॅडम , इ.5वी केवडा,7वी मोगरा व इतर.12वी तील विद्यार्थिनी प्रतिनिधींनी केले. या प्रसंगी कुलप्रमुख व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचे सर्व उत्तम नियोजन केले. वर्गस्वच्छता, वर्गासजावट, फलक लेखन, रांगोळी व शुभेच्छापत्र तयार करुन मंगलमय वातावरण निर्मिती केली. व्यासपौर्णिमेचे महत्त्व, प्राचीन भारतीय गुरु-शिष्य परंपरा, गुरुची महती सांगणाऱ्या स्वरचित कविता विद्यार्थिनींनी सादर केली. मा.उपमुख्याध्यापिका श्रीम.हिले मॅडम यांनी 12वी च्या विद्यार्थिनींना “विद्यार्थीदशेतील कर्तव्य व जबाबदाऱ्या” याविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थिनींनी मा.मुख्याध्यापिका श्रीम.पूजा जोग मॅडम,पदाधिकारी व उच्च माध्यमिक विभागात अध्यापन करीत असणाऱ्या सर्व शिक्षकांना पुष्प व तुळशीचे रोप देवून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

योग दिन

दिनांक 21 जून 2022 ,मंगळवार या दिवशी रेणुका स्वरूप उच्च माध्यमिक विभागातील इ. 12 वीतील विद्यार्थिनींनी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी सहजयोग,प्राणायाम व विविध योगासने करून नियमित सुर्यनमस्कार घालण्याचा ,आरोग्य संर्वधनाचा संकल्प केला .

छत्रपती श्री शाहू महाराज जयंती

दिनांक २१ जून २०२२ ,शुक्रवार या दिवशी रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज मध्ये छत्रपती श्री शाहू महाराजांची १४८ वी  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या प्रसंगी छत्रपती श्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या  मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता १२ वी अबोली मधील  कु. दिव्या संतोष म्हस्के हिने छत्रपती “श्री शाहू महाराजांचे शिक्षण विषयक कार्य” या संबधीची माहिती विद्यार्थिर्नींना सांगितली .

छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मा. मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक.

म.ए .सो रेणुका स्वरूप मेमो.गर्ल्स हायस्कूल व  ज्यु .कॉलेज मधील विद्यार्थिनींचे यश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते’ या प्रसार महोत्सवाचे आयोजन      सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार ,मुख्य वैज्ञानिक सल्लागर समिती ,भारत सरकार यांचे कार्यालय , विज्ञान मंडळ ,सर परशुराम महाविद्यालय,पुणे आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यामाने दि .२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये म.ए .सो रेणुका स्वरूप मेमो.गर्ल्स हायस्कूल व ज्यु .कॉलेज मधील विद्यार्थिनीने यश मिळविले आहे.त्यामध्ये त्यांना  प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन तिचा सत्कार करण्यात आला .बक्षीसपात्र विद्यार्थिनी पुढील प्रमाणे –

इयत्ता १२ वी गुलाब मधील साक्षी बाळू कोकाटे -चित्रकला विषयात प्रथम क्रमांक

इयत्ता ६ वी गुलाब मधील सानवी मनिष मोरे -वक्तृत्व विषयात तृतीय  क्रमांक

संयम कार्यशाळा

आपल्याला सक्षम युवपिढी घडवायची असेल तर त्यांचा बौद्धिक , शारीरिक व भावनिकविकास होणे खूप महत्वाचे आहे , हे जाणून युवा चेतना दिनानिमित १२ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी या कालावधीत, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था व ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संयम’ या कार्यशाळेचे रेणुका स्वरूप उच्चमाध्यमिक विभागामध्ये आयोजन करण्यात आले.माननीय मुख्याध्यापिका. श्रीमती पूजा जोग यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 11 वी च्या विद्यार्थिनींसाठी या कार्यशाळेचे ऑनलाईन नियोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत श्रीमती समृद्धी पानसे व श्रीमती गायत्री जाधव या समुपदेशक यांनी विद्यार्थिनींना कथासांगून, चाचण्या घेऊन तर रोल प्ले तसेच खेळ खेळून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थिनींना संयम म्हणजे काय व आपल्या व्यक्तिमत्व विकसनासाठी कसा आवश्यक आहे. हे पटवून दिले. व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना स्पष्ट करताना बाह्य सोंदर्या बरोबरच आंतरिक सोंदर्य ही महत्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य त्याची स्वच्छता व काळजी कशी घ्यावी. मैत्री ,प्रेम व आकर्षण यातील फरक सोदाहरण पटवून दिले. व्यसनाचे प्रकार, परिणाम व त्यापासून दूर कसे रहावे हे सांगितले . स्व-नियमन व स्व जबाबदारी अंगीकृत करणे किती महत्वाचे आहे हे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांचे फायदे तोटे समजून सांगितले, लैंगिक दुर्वर्तन –जागरुकता ,त्याचे परिणाम ,कायदे व उपाय या विविध विषयावर चर्चा केली. स्त्री-पुरुष समानतेपेक्षा स्त्री –पुरूष पूरकता कशी महत्वाची आहे हे सांगितले. तसेच उद्दिष्ट निश्चिती करताना SWOT analysis कसे उपयोगी आहे व तणावाचे व्यवस्थापन कसे करावे. यासाठी काही प्रयोग सांगितले. पालकसभेद्वारे पालकांशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली .कार्यशाळेची सुरुवात पूर्व चाचणीने तर सांगता उत्तर चाचणीने झाली.

संयम कार्यशाळा सादरीकरण
संयम कार्यशाळा सादरीकरण

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रम २०२२

म.ए.सो च्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कोविड-१९ च्या शासनाने ठरवून दिलेल्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून रेणुका परिवारातील सर्व घटक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सकाळी ७.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.ए. सो नियामक मंडळाच्या सदस्य व प्रशालेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका श्रीमती भावना हरिदास या उपस्थित होत्या .

मा .मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यात शिक्षक म्हणून संविधानाप्रती आपली जबाबदारी व बलशाली भारत निर्माण करणारी पिढी घडविणे यासाठी कटीबद्ध राहण्याची प्रेरणा दिली. प्रमुख पाहुण्या श्रीमती हरिदास मॅडमने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच २६ जानेवारी २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष गोष्टींचा उल्लेख केला. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या१२५ व्या जयंती वर्ष निमित्ताने इंडिया गेट येथे नेताजींच्या मूर्तीची स्थापना, प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभात यापूर्वी वाजविली जाणारी ‘अबाइड विथ मी’ च्या ऐवजी ‘ये मेरे वतन के लोगो’ गाण्याची धून यापुढे वाजविण्यात येईल, कोविड-१९ लसीकरणाबाबत भारत अग्रेसर, शस्त्रास्त्र निर्मिती व निर्यात यात भारताचे स्वावलंबन इ. बाबींचा समावेश होता.

प्रशालेच्या महामात्रा श्रीमती भाटे मॅडम यांनी सर्वांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंधस्पर्धेत परितोषिक मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी ‘बलसागर भारत होवो’ हे समूहगीत सादर केले .

प्रशालेच्या चित्रकला शिक्षिका श्रीमती यशोदिनी कुलकर्णी यांनी रांगोळीतून भारताचे पहिले चीफ ऑफ आर्मी स्टाफ (दिवंगत )बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मुग्धा सामदेकर यांनी केले.

ध्वज प्रतिज्ञा घेताना शिक्षक