आपल्या प्रशालेमध्ये Yuva Unstoppable व जर्मन ऑटोमोबाईल कंपनी मर्सिडीज बेंज यांच्या संयुक्त विद्यमाने रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल इंस्टॉलेशन तसेच स्वच्छतागृहाचे नूतनीकरण असे प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले. या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी आपल्या प्रशालेत ची निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने काल दिनांक 3 जून 2026 रोजी आपल्या प्रशालेतील कुमारी सानवी मोरे, तिचे पालक व मुख्याध्यापिका सौ शुभांगी कांबळे यांना महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या प्रशालेची व संस्थेची माहिती घेतली. शाळेत राबवलेल्या प्रकल्पासंदर्भात कुमारी सानवी मोरे हिच्याकडून माहिती घेतली. ती इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रशालेत प्रथम आली त्याबद्दल तिचे व्यक्तिशः पुष्पगुच्छ कौतुक केले. हा एक अविस्मरणीय असा अनुभव ठरला.🙏
दिनांक 21 जून रोजी रविवार असल्यामुळे शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल मध्ये योग दिवस साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी योगा मॅट, सतरंजी घेऊन योग करण्यासाठी मैदानावर जमा झाल्या होत्या. या सर्व विद्यार्थिनींना योगाभ्यासाचे महत्व समजून देण्यासाठी मनशक्ती पुणे केंद्राच्या प्रमुख अक्षता प्रधान व त्यांची टीम उपस्थित होत्या. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थिनी यांनी योग व प्राणायाम करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा केला.
प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे यांनी मार्गदर्शन करणाऱ्या टीमचे आभार मानले व विद्यार्थिनींना मानसिक शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
Proud Achievement at the Seed the Future Entrepreneurs Competition 2026
We are proud to announce that the students of Renuka Swaroop Memorial Girls' High School, Pune participated in the Seed the Future Entrepreneurs Competition, held on 26th–27th June 2026.
Competing against 216 teams, our students secured a place among the Top 10 finalists, demonstrating exceptional innovation, teamwork, and entrepreneurial spirit.
The team brought great pride to the school by winning two prestigious awards:
🏆 People's Choice Award (based on public voting)
🏆 Best Logo Award
We wholeheartedly congratulate our students on this remarkable achievement and wish them continued success in all their future endeavors.
बक्षीस समारंभ - दि. 26/6/26 रोजी नितू मांडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. इ. 8वी मधील 10 मुली या परीक्षेस बसल्या होत्या.
शाळेचा निकाल 100% लागला.
महर्षी आर्यभट्ट सुवर्णपदक स्काँलरशिप प्राप्त - कु. सौंदर्या संदीप दुडम.( इ. 8 वी. अबोली.)
रोख रक्कम - 1666 रू.
प्रशस्तिपत्रक आणि सन्मान पदके मिळाली.
शाळा समन्वयक म्हणून सौ. दिवटे वर्षा मँडम यांना सन्मान चिन्ह
आणि शाळा सहभाग करीता शाळेला सन्मानचिन्ह मिळाले.
दिनांक १५ जुलै २०२६ शाळेमध्ये महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीबद्दल त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कालिदास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कालिदास यांच्या काव्य, नाटके आणि साहित्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले. भारतीय सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची भावना जागृत व्हावी आणि महान साहित्यिकांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंडळप्रमुख निवडणुक पदांसाठी नुकतीच लोकशाही पद्धतीने निवडणूक उत्साहात पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी विद्यार्थिनींसमोर आपले मनोगत व्यक्त करून प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून गुप्त मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले. मतदान प्रक्रिया शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
मा.मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.जाधव सर,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी यांनी मतदान केले व त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडणुकीमुळे विद्यार्थिनींना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव तसेच नेतृत्वगुण विकसित करण्याची मौल्यवान संधी मिळाली.
म.ए.सो. रेणुका स्वरूप आणि AACCI यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन कौशल्य ( WHO प्रमाणित ) कार्यक्रमाची सुरुवात आज दिनांक १८ जुलै २०२६ रोजी भावे प्राथमिक हॉल मध्ये झाली. इयत्ता ८वी,९वी आणि १०वी च्या विद्यार्थींनीसाठी रोजच्या जीवनात आणि भविष्यात ही जीवन कौशल्य कशी महत्वाची आहेत आणि त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन विविध Activity आणि Role Play मधून समजावण्यात आला.यामध्ये सर्व डॉक्टर्स Dr . अर्चना खेर, Dr. सोनावणे , Dr. शर्ली , Dr. तांबोळकर, Dr. केळकर आणि पूजा छेडा यांनी मुलींना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी कांबळे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री जाधव सर आणि पर्यवेक्षक श्री अनासपुरे सर यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत मा .मुखाध्यापकांनी केले.मान्यवरांची ओळख व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या प्रमुख सौ. फणसळकर मॅडम यांनी केली. कार्यक्रमाची रूपरेषा डिजिटल माध्यमातून पोचविण्याची जबाबदारी सौ. राजपाठक मॅडमनी पार पाडली. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तम गुण मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ, आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला ॲमेझॉन कंपनीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर व प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती अमरजा वैद्य आणि टी एस एल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक श्री. विवेक भिडे सर हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. म.ए.सो. नियामक मंडळाच्या सदस्या व प्रशालेच्या महामात्रा श्रीमती डॉ.मानसी भाटे मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दहावी बारावीच्या विद्यार्थिनीं बरोबरच शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे पाहुण्यांनी आवर्जून कौतुक केले, तसेच विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी प्रशालेमध्ये जे प्रयत्न केले जातात त्याबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे मॅडम यांनी केले.
दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये
साजरी करण्यात आली. मा. मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक जाधव सर व पर्यवेक्षक अनासपुरे सर यांच्या हस्ते मा. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इ. १० वी अबोली मधील सौम्या गंधे हिने अजितदादा पवार यांचा वक्तशीरपणा, त्यांची कामाची हाताळणी, सचोटी, उपमुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी नवमहाराष्ट्राच्या उभारणीमध्ये केलेली भरीव कामगिरी याबद्दल माहिती दिली.
दि. १५ जुलै २०२६ , बुधवार या दिवशी इयत्ता ११ वी तील १०० विद्यार्थिनींकरिता प्रशालेतील पदाधिकारी शिक्षक यांची ओळख व्हावी या उद्देशाने अकरावी स्वागत समारंभ प्रशालेतील भावे प्राथमिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला. इ. १२ वी तील विद्यार्थिनींनी रांगोळी, फलक लेखन, वर्ग सजावट भेटकार्ड देऊन इ. ११ वी तील विद्यार्थिनींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.सागर वाळके सर यांनी केले. मुख्याध्यापिका , पदाधिकारी , शिक्षक यांचा परिचय सौ श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केला. याप्रसंगी माननीय मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे मॅडम यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या मनोगत आतून शालेय शिस्त , मोबाईल, विविध कोर्सेस, उपक्रमांमध्ये सहभाग याविषयी मार्गदर्शन केले सौ मनीषा साळुंखे मॅडम यांनी आभार मानले इ. ११ वीच्या सर्व विद्यार्थिनींना प्रशाले कडून पेढा देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गुरुवार दिनांक २३/७/२०२६ रोजी रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल मध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय शुभांगी कांबळे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोहन शेटे उपस्थित होते .तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक शेखर जाधव सर ,पर्यवेक्षक मनोज अनासपुरे सर ,शालेय शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने करून त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री मोहन शेटे यांनी विद्यार्थिनींच्या समोर आपल्या व्याख्यानातून जिवंत इतिहास डोळ्यासमोर उभा केला. शिवाजी महाराजांचे कार्य त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अतिशय रोचक ,रंजक, रोमहर्षक, सहज सोप्या भाषेत विद्यार्थिनींच्या डोळ्यासमोर उभे केले. त्यांनी पावनखिंड (घोडखिंड) पन्हाळगड ते पावनखिंड प्रवासाचा इतिहास विद्यार्थिनींच्या डोळ्यासमोर उभा केला. अद्वितीय शौर्य, त्याग, स्वराज्यनिष्ठा ,कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्याचा अद्वितीय प्रयत्न केला. व्याख्यान ऐकून सर्व भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी , उपस्थित शिक्षक यांचे आभार मानण्यात आले व विद्यार्थिनींचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शुक्रवार दिनांक २४ जुलै रोजी रेणुका स्वरूप प्रशालेत आषाढी एकादशी पायी वारी सोहळा साजरा करण्यात आला.
कमळ कुलातील इ.५ वी कमळ व ६ वी गुलाब या विदयार्थिनींनी संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई , संत सोपान, संत निवृत्ती या भूमिका साकारल्या. आनंदी वातावरणात विद्यार्थिनी या वारीत सहभागी झाल्या. यामध्ये वारीतील माऊलींच्या मानाच्या अश्वाचे रिंगण, ध्वजाचे रिंगण याची माहिती शुभ्रा बांदलने सांगितली व आषाढी एकादशीची माहिती आरोही शाईवाले ने सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाली शहाणे हिने केले. मा. मुख्याध्यापिका कांबळे बाई व पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर यांच्या हस्ते माऊलींची आरती केली . मुलींबरोबरच शिक्षकांनी सुद्धा वारीचा आनंद लुटाला.
या कार्यक्रमाचे नियोजन या कुलातील कुलाधिपती सौ. तायडे अंजली व सौ.उमा गोंधळेकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने केले.
२६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो मुलांचे विद्यालय, सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला आणि रेणुका स्वरूप प्रशालेतील एनसीसी विभागातर्फे ३० जुलै २०२६ रोजी कारगिल विजय दिवस व व्यसनमुक्ती परिसर जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत २०० कॅडेट्स १० शिक्षक व पोलीस सहाय्यक यांचा समावेश होता. रॅली ची सुरुवात म. ए. सो. सौ विमलाबाई गरवारे प्रशाला येथून माननीय पोलीस निरीक्षक सपना देवकाते मॅडम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. रॅली अलका टॉकीज चौक टिळक रोड मार्गे म.ए.सो रेणुका स्वरूप प्रशालेत आली. म.ए.सो रेणुका स्वरूप प्रशालेत रॅलीचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस निरीक्षक मा.सपना देवकाते विश्रामबाग विभाग पुणे यांनी "देशातील युवा पिढीने देशाला भेडसावणाऱ्या व्यसनाधीनता व सायबर क्राईम या विरोधात भारतीय नागरिक म्हणून हिरीरीने व कर्तव्याने भाग घ्यावा " व "सक्षम विकसित भारत कसा घडेल "या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे सदस्य मा. दिलीपजी शेठ सर यांनी आपल्या मनोगतात युवा पिढीसाठी "निरोगी आरोग्य तसेच भविष्यातील संधी करिअर मार्गदर्शन" या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या संकल्पनेत म. ए.सो. मुलांच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी पराग गुजराती याचा विशेष सहभाग व मार्गदर्शन होते. हद्दीतील दामिनी पथकातील दामिनींचा प्रातिनिधिक स्वरूपात याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास म.ए.सो चे तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रमे मा.सायसिंग वसावे, मा. रोहिदास भारमळ मा. शुभांगी कांबळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे एन.सी.सी ऑफिसर्स F/O कुलकर्णी यशोदिनी, S/O सुनील जोशी S/O मंजुश्री देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका स्वरूप प्रशालेच्या व्यक्तिमत्व विकास विभागाच्या प्रमुख संध्या फणसळकर यांनी केले.
गुरुवार दिनांक ३० जुलै २०२६ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या औचित्याने प्रशालेच्या विद्यमान शिक्षिका आणि प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी ह. भ. प. निवेदिता मेहंदळे यांचे कीर्तन आयोजित केले होते. कीर्तन परंपरा, गुरूंचे मानवी जीवनातील महत्त्व, ईश्वराचे नामस्मरण,नैतिक मूल्यांची शिकवण इ विषयक जागृती विद्यार्थिनींमध्ये व्हावी या उद्देशाने भावे प्राथमिक सभागृहात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तबला पेटीची उत्तम साथ श्री. मुकुंद जोशी आणि श्रीमती शिरीषा जोशी यांनी दिली. कार्यक्रमाकरिता प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे मॅडम, पर्यवेक्षक मा. अनासपुरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती काळे यांनी केले.
पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्यु. कॉलेज शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.
इ. १० वी अबोली व इ. ९ वी कमळ या दोन वर्गाच्या कलिका कुलाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती हा कार्यक्रम प्रशालेमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे व्यक्तींनी केलेल्या महान कार्याची माहिती सांगितली. यानिमित्त प्रशालेमध्ये निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थिनींना पारितोषिक वितरण करण्यात आले.
म. ए. सो. रेणुका स्वरूप प्रशाला येथे इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्री पेंटिंग’ (Umbrella Painting) या नाविन्यपूर्ण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला (Creativity) प्रोत्साहन देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळेची सुरुवात कला शिक्षक श्री. यशोदिनी सचिन कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना कपड्यावर (Fabric) रंगकाम करताना घ्यावयाची काळजी, ॲक्रेलिक/फॅब्रिक रंगांचा योग्य वापर आणि छत्रीवर डिझाइन रेखाटण्याच्या विविध पद्धतींचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतः आणलेल्या पांढऱ्या अथवा एकरंगी छत्र्यांवर विविध प्रकारच्या नक्षीकाम, निसर्गचित्रे, भौमितिक आकार आणि सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटली. इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून साध्या छत्र्यांना अतिशय सुंदर व आकर्षक रूप दिले. रंगांची संगती आणि रेषांचा सुटसुटीतपणा यामुळे प्रत्येक छत्री एक उत्तम कलाकृती बनली होती. स्वतःच्या हाताने रंगवलेली छत्री वापरण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
विद्यार्थ्यांना कापडावर रंगकाम करण्याचे तंत्र शिकायला मिळाले. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व रंगीबेरंगी छत्र्यांचे एक छोटेखानी प्रदर्शन भरवण्यात आले, ज्याचे कौतुक शाळेतील इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले. ही छत्री पेंटिंग कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि कलात्मकदृष्ट्या समृद्ध करणारी ठरली. शाळेच्या वतीने अशा उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
कुल तारका २०२६ - २७
इयत्ता दहावी कमळ व सातवी अबोली
9 ऑगस्ट क्रांतिदिना निमित्त प्रशालेत सादर झालेला कार्यक्रम.
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे व सर्वस्व त्यागाची भूमिका बजावलेल्या आपल्या सर्वांचे ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करून अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम थोड्याच अवधीत सादर केला .
कार्यक्रमाची सुरुवात आजच्या प्रमुख पाहुण्या इतिहास प्रेमी सौ पवार प्रज्ञा यांनी आपल्या दमदार शैलीतून काश्मीरची राणी दिद्दा तिचे कार्य याविषयी मुलींना अतिशय जोशपूर्ण अशी माहिती सादर केली
विद्यार्थिनींनी विविध पेहराव करून त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई ,इंदिरा गांधी, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, इत्यादींच्या वेशभूषेतून त्यांच्या कार्याची माहिती दिली .
क्रांती म्हणजे नेमके काय? ती समाजात कशी घडली. याविषयी सविस्तर माहिती कु. सिंध्दी कुंदुरकर या विद्यार्थिनीने कणखर आवाजातून विद्यार्थिनी समोर साकारली. देशभक्तीपर गीत दहावी कमळ नेआपल्या नृत्यातून सादर करून, वातावरण अतिशय भावुक करून टाकले .
आजच्या दुसऱ्या वक्त्या श्रीमती. वंदना कानडे. बाईंनी कारगिल युद्ध कथा द्वारे परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांची गोष्ट अतिशय स्पष्ट व मुद्देसूद माहिती देऊन मुलींना मंत्रमुग्ध केले.
इयत्ता पाचवी गुलाब मधील विद्यार्थिनी राधिका शेळके हिने भगतसिंगांबद्दल माहिती दिली.
माननीय मुख्याध्यापिका सौ. कांबळे शुभांगी. मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे व माननीय पर्यवेक्षक श्रीयुत. अनासपुरे सर .यांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पिठे धनश्री व आभाराचे काम कु.बोडखे ज्ञानेश्वरी यांनी व्यवस्थित रित्या पार पाडले .
इयत्ता सातवी अबोली वर्गशिक्षिका सौ स्वाती गायकवाड
इयत्ता दहावी कमळ वर्गशिक्षिका सौ कल्याणी बिडवे
दिनांक-- 11/8/2026
वार-- बुधवार
कुलाचे नाव--हंस, कलिका
कुलातील सहभागी वर्ग--- दहावी जाई, पाचवी अबोली, सातवी गुलाब, सहावी केवडा
दिनांक 11/.8/2026 वार बुधवार प्रशालेत कुल कलिका व हंस या कुलां तर्फे दीप अमावस्येचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळेस विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर सुंदर असे दिवे पूजनासाठी आणले होते. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री अनासपुरे सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .
दीप अमावस्या या दिनाचे आपल्या संस्कृतीतील विशेष असे महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. सर्व विद्यार्थिनी दीप पूजन केले .कुलातील सर्व सहभागी शिक्षक मंडळाधिपती शिक्षक या सर्वांनी पूजन केले. प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिकाश्रीमती कांबळे मॅडम , उपमुख्याध्यापक श्री जाधव सर, पर्यवेक्षक श्री अनासपुरे सर यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या व वेळेत पार पडला.
म.ए.सो रेणुका स्वरूप प मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे ३०.
१५ ऑगस्ट२०२६ स्वातंत्र्य दिन समारोह
भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात सेनानींच्या कृतज्ञता पूर्ण स्मरणार्थ आयोजित ८० व्या स्वातंत्र्य दिन समारोहाच्या प्रसंगी रेणुका स्वरूप प्रशालेत उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण
वंदे मातरम् ,राज्यगीत, ध्वजगीत, अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, भारतमाता पूजन संपन्न झाले. लष्करी सेवेत १९६२,१९६५ व १९७१ या तीनही भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले मेजर अरुण फाटक (निवृत्त), म.ए.सो पेरोगेट भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी यांनी प्रमुख अतिथीपद भूषवले. प्रशालेतील गायन विभागातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी व ज्येष्ठ सेवक श्री. मोहन कनगरे यांनीही प्रमुख अतिथीपद भूषवले. तसेच ग्लोबल लॉजिक टीमचे पदाधिकारी,म.ए.सो.नियामक मंडळाचे सदस्य डॉक्टर रविकांत झिरमिरे व प्रशालेचे सन्माननीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रशालेचे शान असलेले घोषपथक, एन.सी.सी विभाग, गाईड विभाग, कुलप्रमुख पथक इ.नीही मान्यवरांना मानवंदना दिली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी केलेल्या ‘जल आहे तर जीवन आहे’ या विषयावर आधारित हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी वाढदिवस असलेल्या विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर अरुण फाटक यांनी विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्व जाणून सर्वत्र स्वच्छतेचा अंगीकार करा, आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश संपादन करा व एन.डी.ए मध्ये सामील होऊन उच्च स्वप्न साकार करण्याचा ध्यास घ्या, असा मोलाचा संदेश दिला.



































































